सूचीमधील चूक दुरुस्ती

 • दस्त नोंदणी पूर्ण झाल्यानंतर दस्तात काही बाबी/तथ्ये (उदा. नाव, मिळकतीचे वर्णन इ. मध्ये) चूक झाल्याचे आढळून आले आहे अशा परिस्थितीत काय करावे ?
   

  अशा प्रकरणात मूळ दस्तातील सर्व पक्षकारांना झालेली चूक दुरुस्त करण्याकामी चुकदुरुस्तीपत्राचा (Correction Deed) किंवा इतर योग्य तो दस्त तयार करुन त्या दस्ताची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करुन घेता येईल. मात्र अशा चूक दुरुस्तीच्या किंवा कोणत्याही दुस-या दस्तास मुद्रांक शुल्क व नोंदणीसंबंधीचे सर्व नियम लागू राहतील.
 • दस्त नोंदणी झाली आहे, दस्तातील तपशील बरोबर आहे, मात्र दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळालेल्या सूचीमध्ये (Index) चूक आढळून आली आहे, अशा परिस्थितीत काय करावे ?
   

  दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळालेल्या सूचीमध्ये (Index) चूक आढळून आल्यास पक्षकारांना दुय्यम निबंधक कार्यालयाकडे अर्ज करुन सुधारित सूची प्राप्त करुन घेता येईल.
 • नोंदणी झालेल्या दस्ताप्रमाणे सूची तयार झाली नसल्यास किंवा सूचीमध्ये चूक झाली असल्यास अशी चूक दुरुस्तीस मंजुरी देण्याचे अधिकार कोणास आहेत ?
   

  सदरचे अधिकार हे जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांना आहेत.
 • सूचीमधील चूक दुरुस्तीची कार्यपध्द्ती सांगा.
   

  सूचीमधील चूक दुरुस्तीची कार्यपध्दत:- • संबंधित पक्षकार चूक दुरुस्त होण्याकरिता दुय्यम निबंधकांकडे अर्ज दाखल करु शकतात. • दुय्यम निबंधक हे असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर किंवा अन्य कारणाने त्यांच्या निदर्शनास आल्यावर, त्यांच्या कार्यालयीन अभिलेखाची तपासणी करुन दुरुस्तीची आवश्यकता दिसून आल्यास अशी चूक दुरुस्ती करण्यास मान्यता मिळण्याकरिता सह जिल्हा निबंधक यांच्या मार्फत जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांना शिफारस करतील. • जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी, हे दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्ताची प्रत, दुय्यम निबंधक यांची शिफारस, पक्षकाराचा अर्ज (असल्यास) या सर्वाचा एकत्रित विचार करुन सूची दुरुस्त करण्यास मंजुरी देतील अथवा नाकारतील. • चूक दुरुस्ती करण्याची मंजुरी मिळाल्यास दुय्यम निबंधक हे सूचीच्या मूळ अभिलेखात उक्त आदेशाची नोंद घेऊन आदेशित केल्याप्रमाणे दुरुस्ती करतील.
 • एखादा दस्त नोंदणी होऊन परत मिळाल्यानंतर पक्षकारांकडून गहाळ झाला तर त्यांनी काय करावे ?
   

  • त्या पक्षकारांना संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज करुन व नक्कल फी भरुन त्या दस्ताची प्रमाणित प्रत (Certified Copy) उपलब्ध करुन घेता येईल.
  • नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 57 नुसार, दुय्यम निबंधक कार्यालयातुन मिळालेल्या दस्ताची नक्कल (Certified Copy) ही त्या मूळ दस्तामध्ये नमूद बाबी (Contents) सिध्द करण्यासा ी पुरावा म्हणून ग्राहय धरली जाते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]